अमळनेर: अमळनेरच्या इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. ‘मंगळ ग्रह सेवा संस्थान, अमळनेर’ यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मान्यतेनंतर ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 एफ.एम.’ या सामुदायिक रेडिओच्या चाचणी प्रसारणाला सुरुवात झाली आहे. लवकरच या रेडिओचे औपचारिक उद्घाटन होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांनी सांगितले.
या रेडिओद्वारे स्थानिक श्रोत्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, कृषी आणि मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात जनजागृती घडवून आणणे, लोकसहभाग वाढविणे आणि नव्या पिढीला योग्य दिशा देणे, हे या रेडिओचे मुख्य उद्दिष्ट आहे.
एक विशेष बाब म्हणजे, ‘रेडिओ मंगल ध्वनी’ चे प्रसारण आता केवळ अमळनेरपुरते मर्यादित न राहता, जगभर पोहोचले आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर याचे स्वतंत्र अॅप उपलब्ध असून तसेच ‘Radio Garden’ या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरसुद्धा हे रेडिओ ऐकता येते. त्यामुळे अमळनेरच्या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना जगभरातील कोट्यवधी श्रोत्यांचे व्यासपीठ मिळाले आहे.
शहरात प्रथमच अशा प्रकारचे शाश्वत माध्यम उपलब्ध झाल्याने अमळनेरमध्ये आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 एफ.एम.’ ही एक नवी उमेद, नवा आवाज आणि नव्या दिशा देणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.







