भरवस – आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी लवकरच शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, शिक्षक, पालक, गावकरी आणि मान्यवर यांची गर्दी उसळली होती. संपूर्ण शाळा आणि परिसर तिरंग्याच्या रंगांनी, फुलांनी आणि देशभक्तीच्या घोषवाक्यांनी सजविण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने आणि देशभक्तीपर गीतांनी करण्यात आली. ध्वजारोहणाचा मान संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब प्रा. डॉ. श्री. संजय सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी एकमुखाने राष्ट्रगीत गायले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव बापूसाहेब श्री. व्ही. एस. सोनवणे, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर अध्यक्ष प्रा. डॉ. सोनवणे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान, आजच्या पिढीची जबाबदारी आणि शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. सचिव श्री. व्ही. एस. सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, देशभक्ती आणि एकतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता, नाटिका आणि भाषणे सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे शिक्षकांनी केले, तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापकांनी मान्यवरांचे आणि सर्व उपस्थितांचे केले. अखेरीस उपस्थितांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले आणि देशभक्तीच्या जयघोषात कार्यक्रमाचा समारोप झाला.







